‘वास्तवाचा आणि अनुभवांचा तार्किक दृष्ट्या अर्थ लावणे हेच आपले जीवन आहे. आपल्या जीवनाची सुरुवात ‘पॅशन’ पासून होते. आपण आपला प्रत्येक दिवस तीन गोष्टींनी सुरू करतो. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मला काहीतरी साध्य करायचे आहे, दुसरी गोष्ट म्हणजे-भीती आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा/ आपला विश्वास. आपल्या मनातील भीती आणि वास्तव यांच्यातील अंतर कमी करणे व सत्य काय आहे ते जाणून घेणे हा आपण घेत असलेल्या शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे. अभियंत्याच्या जीवनात गणिती बुद्धिमत्ता, व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवू नये तसेच देशासाठी योगदान देण्यातच आपल्या जीवनाचे खरे सार्थक आहे.’ असे प्रतिपादन सी.वाय.एम.ई अॅटोमेशन सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. श्रीनिवास चामर्थी यांनी केले.
स्वेरीमध्ये ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) च्या मध्यवर्ती समितीचे भारत सरकार नियुक्त सदस्य डॉ. संजय तोष्णीवाल म्हणाले की, ‘अनेक समाजोपयोगी गोष्टींचा शोध हा भारतामध्ये लागला आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात हे संशोधन अधिकाधिक प्रगत होत आहे. पुर्वी संवादासाठी प्रचंड वेळ लागायचा आणि आता बदलत्या प्रवाहानुसार एक सेकंदात आपण इतरांशी संवाद साधू शकतो, हा बदल कालानुरूप होत आहे. हे केवळ प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये समाजोपयोगी संशोधन करण्याच्या बऱ्याच संधी संशोधकांसाठी उपलब्ध आहेत म्हणून देशाच्या विकासासाठी समाजोपयोगी संशोधने होण्याची आज गरज आहे. आयुर्वेद, योग यासारख्या गोष्टींचा शोध आणि उगम हा भारतामध्ये झाला.
आजच्या धावपळीच्या युगामध्ये संपूर्ण जगाला याचे महत्व समजून आले असून इतर देशांनी या बाबींची दखल घेतली आहे. गेल्या ११ वर्षामध्ये पेटंट फाईल होण्याचे प्रमाण वाढले असून स्टार्टअप, आत्मनिर्भर अभियान यासारख्या गोष्टींमधून संशोधनास चालना मिळाल्याने ते शक्य झाले आहे. आपण जे संशोधन करत आहोत त्याचे बौद्धीक संपदा हक्क (एंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट) मिळवणे गरजेचे आहे.’ निलसॉफ्ट या कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ.प्रताप सानप यांनी आपल्या भाषणातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात झालेली संशोधने यावर प्रकाश टाकला. परिषदेमधील बहुतांश संशोधकांनी सध्याच्या समाजापुढील ज्वलंत समस्या ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले. या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. श्रीनिवास चामर्थी बोलत होते. या प्रसंगी सुरुवातीला या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसमन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी या परिषदेची सुरुवात कशी झाली हे सांगून संस्थेला वेगवेगळ्या शासकीय व खाजगी संस्थांकडून मिळालेल्या संशोधन निधी बाबत सांगितले.
२०१६, २०१८ आणि २०२० साली झालेल्या परिषदांचे उदघाटन अनुक्रमे पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मश्री कोटा हरिनारायण, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केल्याचे सांगितले तसेच पुढे त्यांनी दि. ९ व १० डिसेंबर रोजी झालेल्या परिषदेत मार्गदर्शन केलेल्या जगभरातील विविध संशोधकांची नावे व त्यांचे विषय याबाबत सविस्तर विवेचन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली. समारोप दिनी डॉ. गौरव बरतारया, डॉ. विजयकुमार पाल, डॉ. कॅशफुल ओरा, डॉ. एन.बी.पासलकर, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबईचे निवृत्त जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के.सुरी, निलसॉफ्ट या कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप सानप आदी तज्ञ संशोधकांचे विचार भविष्यकालीन संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरले. एकूणच ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत लोकांनी पुढे यावे’ असे सांगून आजच्या जगात नॅनो टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व आले असल्याचे तज्ज्ञांनी पटवून दिले.
परिषदेच्या शेवटच्या सत्रात पॅनल डिस्कशन (चर्चासत्र) चे आयोजन केले होते. यामध्ये स्वेरीचे सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन असे मिळून एकूण ४०७ रिसर्च पेपर्स प्राप्त झाले. यावेळी संजय पवार, सतीशकुमार वर्मा व सतिश चव्हाण यांना प्रातिनिधिक स्वरुपात पाहुण्यांकडून परिषदेत सहभागी झाल्याबद्धल प्रमाणपत्रे दिली. एकंदरीत ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि भविष्यकालीन संशोधन या सर्व बाबतीत मोलाची ठरली, हे मात्र निश्चित!
‘टेक्नो-सोसायटल २०२२ ही चौथी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसमन्वयक डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या मधील प्रमुख व सदस्यांनी परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी विश्वस्त बी. डी.रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. अशोक रानडे, डॉ. पद्माकर केळकर, लक्ष्मी हाईड्रॉलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शरदचंद्र ठाकरे, संस्थेचे संस्थापक सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ.एन. बी. पासलकर, डॉ. व्ही. के. सूरी, डॉ. विजय कुलकर्णी, माढा रयत महाविद्यालयाचे डॉ. राजगुरू, युवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगे आदी उपस्थित होते. शेवटी सहसमन्वयक डॉ. पवार यांनी आभार मानून या परिषदेची सांगता केली.