सोलापूर : सोलापुरातील पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते मुंबई, पुण्याला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात आणि मनात काही तरी सांगण्यापेक्षा किंवा भरवण्यापेक्षा ग्राऊंड लेव्हलला राहून काम करावे. ग्राऊंड लेव्हलला राहून काम केले तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस लतीफ तांबोळी यांच्याकडे पाहत दिला.
सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात झालेल्या ग्रामीण राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. ‘माझ्या बोलण्याने कोणाला वाईट वाटले असेल, तर मला फरक पडत नाही; कारण मी खर बोलतो, आणि करेक्ट बोलतो,’ असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली.
जिल्हा राष्ट्रवादीतील महिला, युवक, युवती, विद्यार्थी, सामाजिक न्याय, पदवीधर, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक अशा विविध सेलचा आढावा त्यांनी घेतला. प्रत्येक सेलच्या जिल्हाध्यक्षाला समोर बोलावून तुमची कार्यकारिणी किती जणांची आहे, त्यातील किती जण उपस्थित आहेत, किती तालुक्याचे दौरे केले. पक्षासाठी केलेले शेवटचे काम कधीचे व कोणते यासह अनेक प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी आढावा घेतला. मध्ये मध्ये बोलणाऱ्यांना थांबवत तुम्ही बोलू नका, त्यांना बोलू द्या, तुम्ही काय त्यांची वकिली घेतली आहे का? अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्ये मध्ये बोलणाऱ्यांनाही सुनावले.
युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा दौरा करावा. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची काय स्थिती राहिल, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी प्लस आणि मायनस आहेत, त्या संदर्भातील अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी युवक अध्यक्ष गणेश पाटील यांना केली.
या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हा निरीक्षक सुरेश घुले, कल्याणराव काळे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. सुप्रिया गुंड आदी उपस्थित होते.
भगिरथ भालके उशिरा आले अन् पंचाईत झाली..
या कार्यक्रमासाठी पंढरपूरचे युवा नेते भगिरथ भालके उशिरा पोहोचले. त्यांच्या उशिरा पोहोचण्याची दखल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणात घेतली. उशिरा आले आणि पाठीमागे बसल्याचा उल्लेख प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या भाषणात केला. मी बाजूला ऑफिसमध्ये बसलो असल्याचे भालके यांनी सांगितले. तिकडे का बसला होतात? कार्यक्रमात का आला नाहीत? अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांसमोर केल्याने भालके यांची पंचाईत झाली.