जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर,जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा..!
असा थोर अध्यात्मिक महिमा असलेल्या पंढरपूरची ओळख आता शौचालयाचे पंढरपूर… अशी होते की काय अशी भिती वाटू लागली आहे.
भाविकांच्या सेवेसाठी म्हणून पंढरपूर शहरात नुकतीच 100 कोटींची शौचालये उभारली आहेत.
उभारलेल्या या शेकडो शौचालयाचा हेतू साध्य झाला का याची खातरजमा न करता प्रशासनाने नव्या शौचालय उभारणीचा घाट का घातला आहे हे उमजत नाही.
शौचालय बांधा अशी कोणाची मागणी नाही का बांधले नाहीत, म्हणून कोणाची तक्रार नाही, मग अट्टाहास कशासाठी तेच कळत नाही.
सार्वजनिक शौचालयाची गरज आहे का? तर नक्कीच आहे, पण ती कुठे उभा करायला हवीत याचे भान प्रशासनाने न बाळगल्याने, उभारलेली बहुतांश शौचालये अक्षरशः धूळखात पडून आहेत.
गावातील भटके कुत्रे देखील या अडगळीत उभारलेल्या शौचल्यावर पाय वर करण्यासाठी गेले नसेल.
हा कटू अनुभव पाठीशी असताना जिल्हा प्रशासनाने आणखी सात ठिकाणी शौचालय उभारण्याचा घाट घातला आहे.
त्यासाठी आणखी काही कोटींची उधळण केली जाईल.
विकासाच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा बावळटपणा सुरु आहे.
पंढरपूर शहरात नीट रस्ते धडाचे नाहीत. लहान मुलांना हुंदडायला बाग नाही. चंद्रभागा वाळवंटाची अस्वच्छता आदी अनेक समस्यांनी पंढरी नगरी ग्रासलेली असताना त्याची सोडवणूक करण्याऐवजी शौचालय उभारण्यावर प्रशासनाचा जोर आहे.
तीर्थक्षेत्र म्हणून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शौचालय ही महत्त्वाची गरज आहे पण ती आवश्यक ठिकाणी न उभारल्याने शौचालय उभारणीसाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये अक्षरशः मातीत गेले आहेत.
त्यामुळे शौचालय उभारण्याऐवजी प्रशासनाने पंढरपूर शहरातील ज्या प्रमुख समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयन्त करावेत. मगच शौचालय उभारण्याचा विक्रम पूर्ण करण्याचा अट्टाहास करावा.
लोकप्रतिनिधी आणि पंढरपूरकरांनी प्रशासनाच्या या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवावा…