अभियंत्याला कोणत्याही क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देता आले पाहिजे..!

इंजिनिअर्स हे लढाऊ योद्धे असतात. ते समाजातील समस्या आपल्या बौद्धिक क्षमतेने सोडवत असतात. त्यासाठी त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकावर भर देवून पूर्ण करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी मधील प्रत्येक शाखा महत्वाची आहे. फक्त प्रत्येक शाखेचे महत्व लक्षात आले पाहिजे. करिअर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजिनिअरिंगच्या सर्व शाखा स्वेरीमध्ये आहेत. यासाठी प्रथम मोठी स्वप्ने पहा आणि पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अफाट कष्ट करा कारण चांगले आयुष्य व्यतीत करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपल्या मनगटावरील बळावर व घामाच्या धारेवर विश्वास असणे गरजेचे आहे, म्हणून प्रथम आपले ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाहेरच्या विश्वात वावरताना प्रत्येक प्रश्न हे तुम्हालाच सोडवावे लागतात. त्यासाठी आपण कोणत्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देता आले पाहिजे.’ असे प्रतिपादन जेष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. नारायण दिवेकर यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६२ व्या जयंती निमित्त ‘अभियंता दिन’ आणि ‘ऑलम्पस २ के २३’ या तांत्रिक स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.नारायण दिवेकर हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. प्रारंभी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे. यशाकडे झेपावताना संघर्ष जरूर करा पण, परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्नांना योग्य दिशा द्या आणि भविष्याचा विचार करून नवीन आव्हाने स्वीकारण्यास सज्ज रहा.’ असे आवाहन केले.

ऑलम्पस २ के २३’ चे विद्यार्थी अध्यक्ष ऋतुराज तारापुरकर यांनी ‘ऑलम्पस २ के २३’ या तांत्रिक स्पर्धेचे स्वरूप, स्पर्धेतील प्रकार, बक्षिसे, यासाठी बाहेरून आलेले स्पर्धक याबाबत सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना शिक्षणतज्ञ प्रा.दिवेकर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी गजबजलेला स्वेरीचा हा कॅम्पस पवित्र आणि उत्साहवर्धक दिसून आला. स्वेरीने केलेल्या स्वागताने मी आज भारावून गेलो. प्रत्येक कार्यात येथील विद्यार्थी मनापासून सहभागी होतो याचा खूप आनंद वाटतो. विद्यार्थी अभियंत्यांनी नेहमी सकारात्मक विचार करून कृती करावी. आपले यश कशात आहे हे ओळखुन आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. कल्पना, बुद्धीमत्ता, नियोजन, निर्मिती या बाबी देखील अतिशय महत्वाच्या आहेत. अपेक्षा न ठेवता केलेले कोणतेही कार्य मोलाचे असते, हे मात्र कधीही विसरू नका. निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाचा भविष्यात फायदा होतो.’ असे सांगून ‘अभियंत्यांच्या कार्याबाबत’ अभ्यासपूर्ण विचार मांडले. अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘आपण ‘बेस्ट’ च्या दिशेने वाटचाल करताना स्वतःला जे योग्य वाटते त्या क्षेत्रात ध्येय निश्चित करा, आपल्यामधील योजना, संकल्पना यांना योग्य वाव द्या. मित्रांशी संवाद साधा, पर्यटन स्थळांना भेटी द्या. योगा, प्राणायम यावरही भर द्या. हे सर्व करत असताना आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राला प्रामाणिक आणि योग्य न्याय द्या.’ असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अभियंता आणि करिअर याबाबत अनेक प्रश्न विचारले असता प्रा. दिवेकर आणि व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी त्यांची उत्तरे दिली. ‘ऑलम्पस २ के २३’च्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी कॅम्पसमध्ये विविध प्रकल्पांच्या सादरीकरणाची तयारी करत होते. या निमित्ताने सर्व विभागात अत्याधुनिक प्रकल्प, मशीन्स, ब्रीज, बांधकामाचे नमुने यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.

प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रा.दिवेकर यांनी देखील सर्व विभागांना भेट देवून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. अभियांत्रिकीच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या ‘चांद्रयान-३’ च्या एलव्हीएम-३-एम ४ रॉकेटची प्रतिकृती विशेष लक्ष वेधून घेत होती. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, ‘ऑलम्पस २ के २३’ चे समन्वयक प्रा. डी.टी.काशीद, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. गजानन वाघमोडे, तृप्ती कदम व सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर ‘ऑलम्पस २ के २३’ च्या सहसचिव सोनाली करविर यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *