पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता. सदर एम. आय. डी. सी. साकार झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील निरनिराळ्या विकासात्मक बाबींचा विकास कसा होऊ शकतो यावर फक्त कागदी घोडे नाचवून या मुद्द्याला वारंवार उर्जित ठेवण्याचा प्रयत्न सतत केला जात होता. परंतु विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मंगळवेढा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांनी जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी बाबींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आपले राजकीय कौशल्य पणासलावून आत्तापर्यंतचा सर्वात भरीव आणि मोठा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे. आमदार आवताडे यांची ही विकासाभिमुख दृष्टी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. आ. आवताडे यांच्या या मागणीला सक्षमपणे पुष्टी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाची गती वाढविण्याचे निर्देश उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री ना. नंबर उदय सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक संपन्न झाली. त्यावेळी संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.
मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींच्या धोरणात्मक प्रगतीचा रथ पुढे संक्रमित करत असताना आमदार आवताडे यांनी पंढरपूर एम. आय. डी. सी पूर्णत्वास जाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चंग बांधला आहे. अशातच राज्यामध्ये सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर आमदार आवताडे यांच्या या मागणीला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीस आणखी धार प्राप्त झाली. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्र तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदर एम. आय. डी. सी. साकार होणे ही काळाची गरज असल्यामुळे आमदार आवताडे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून या प्रश्नाच्या अनुषंगाने पाठपुरावा केला होता. येथील स्थानिक बेरोजगारी व आमदार आवताडे यांची या मागणीबद्दल असणारी तळमळ लक्षात घेऊन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या सह्याद्री शासकीय निवासस्थानी आमदार आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन या प्रश्नावर सखोल चर्चा केली.
सदर बैठकीमध्ये पंढरपूर एम.आय.डी. सी संदर्भात आमदार आवताडे यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींची माहिती मंत्री महोदय यांच्यासमोर मांडली. आमदार आवताडे यांनी मांडलेल्या या माहितीच्या आधारे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक शासकीय गोष्टींची पूर्तता करून पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार आवताडे यांच्या आत्तापर्यंत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसत आहे. पंढरपूर तालुका व शहर मधील युवक युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न या एम.आय.डी. सी मुळे मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यासोबत तालुक्याच्या आर्थिक समीकरणाची चाकेसुद्धा अधिक गतिमान होणार आहेत.