इंदापूरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कलगीतूरा नेहमीच सुरु असतो. मात्र आता दत्तात्रय भरणे यांच्या जोडीला हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. त्यांनी काटी येथील सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर केलेली जळजळीत शब्दातील टिका आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
‘आपण आपल्या कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरती मिरवणूक काढल्यानंतर समोरची पार्टी लगेच आपले अनुकरण करत त्यांचीही ( हर्षवर्धन पाटील ) यांचीही घोड्यावरती मिरवणूक काढतात. मात्र आपला घोडा हा रेसचा घोडा असून त्यांचा घोडा हा नाचणारा घोडा आहे. ‘अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आता आपल्या या भावाला हर्षवर्धन पाटील कसे उत्तर देतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रशांत पाटील हे हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि माजी सहकारी. प्रशांत पाटील हे राष्ट्रवादीत आल्यानंतर भरणे त्यांना बरोबर घेऊन फिरताना दिसत होते. मंत्रालयातही ते प्रशांत पाटील यांना घेऊन गेले होते. तालुक्यातील अनेक कार्यक्रमात दोघेही सोबत होते.
आता काटी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशांत पाटील यांनी केलेल्या या टिकेची तालुक्यात सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रशांत पाटील हे एकेकाळी हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचे अनेक आतले किस्सेही प्रशांत पाटील यापुढील काळात काढतात की काय अशी शक्यताही राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.