लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी याआधी गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या केल्या आहेत. मात्र, आता नेकनूरमध्ये त्यांच्यासदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तसेच या मागणीसाठी त्यांनी थेट नेकनूर येथील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
निवृत्ती महाराज इंदुरीकर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच तितकेच लोकप्रियदेखील आहेत. त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मागणी असते. याप्रमाणेच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन कळसंबर गाव येथे ठेवण्यात आले होते. मात्र, इंदूरीकर महाराज यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला. यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आणि गावकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गावकऱ्यांनी सांगितले की, इंदूरीकर महाराजांच्या किर्तनासाठी तब्बल एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, त्यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी नेकनूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
किर्तनाचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे कळसंबर गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यातील एका गावकऱ्याने सांगितले की, इंदूरकीर महाराज यांनी आजच्या कीर्तनासाठी आम्हाला शब्द दिला होता. त्यामुळे आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी सुमारे सव्वालाख रुपये खर्चून कीर्तनाची पूर्ण तयारी केली. मात्र, अचानक इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन रद्द केल्याचा निरोप आम्हाला आला. हे योग्य नाही. आम्ही पैसे गोळा करून हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, आजच्याच दिवशी त्यांनी इतर ठिकाणी कुठे कीर्तन ठेवले तर मात्र आम्ही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, असे एका संतप्त गावकऱ्याने सांगितले.
तसेच इंदूरीकर महाराजांच्या निर्णयानंतर गावकरी म्हणाले की, जर तुम्हाला बरे नसेल, पित्ताचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेतो. मात्र, दिलेला हा शब्द मोडू नका आणि आमची फसवणूक करू नका. गावातील लोकांनी 2-2 रुपये गोळा करून रक्कम जमा केलेली होती. त्यामुळे अशाप्रकारे फसवणे बरे नाही. तसेच जर तुम्ही आम्हाला फसवून इतर ठिकाणी कीर्तन केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आमची आहे, असेही गावकरी म्हणाले आहेत.