महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित मोहोळ येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता विकास पंढरीनाथ पानसरे यांनी दिनांक २९.१२.२०१६ रोजी केलेल्या आत्महत्याप्रकरणी कार्यकारी अभियंता बालाजी रामराव डूमने व अधीक्षक अभियंता धनंजय रामभाऊ औंढेकर यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने दोन्ही अभियंत्यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, मयत विकास पानसरे हे मोहोळ येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित मोहोळ येथे काम करीत होते. त्याचे कुटुंबीय पुणे येथे राहत होते. विकास पानसरे त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत जोंधळे यांच्या सोबत सुभाष नगर, मोहोळ येथे राहत होते. आरोपींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती व त्या त्रासाला कंटाळून त्यांनी दिनांक २९.१२.२०१६ रोजी आत्महत्या केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. संगणक अभियंता असणारी त्यांची पत्नी अनिता पानसरे हिने याबाबत आपल्या पतीस कार्यकारी अभियंता बालाजी डूमणे व अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिलेल्या त्रासामुळे त्यांच्या पतीने आत्महत्या केली अशी फिर्याद दिली होती. सदर फिर्यादीचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्रक पाठवले होते. सरकार पक्षाचा पुरावा विश्वासार्य नाही व फिर्याद देण्यास अक्षम्य विलंब झालेला आहे. सरकार पक्षाच्या पुराव्यांवर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही असा बचाव आरोपीपक्षातर्फे करण्यात आला.
या खटल्यात आरोपी क्रमांक १. बालाजी रामराव डुमणे यांच्यातर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे व आरोपी क्रमांक २ धनंजय रामभाऊ औंढेकर यांच्यातर्फे ॲड. वामनराव कुलकर्णी, ॲड. पंकज कुलकर्णी , ॲड. प्रसाद संकल यांनी तर सरकारतर्फे ॲड. नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले.