‘उठा राखे सैयां मार सके ना कोई’ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. याच म्हणीचा प्रत्यय एका कोंबड्यासोबत तंतोतंत घडला आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना चेन्नईतील पल्लवरमध्ये घडली आहे.
त्याचे झाले असे की, चेन्नईच्या पल्लवरममध्ये एका बांधकामाधीन इमारतीत पुजेदरम्यान कोंबड्याचा बळी दिला जात होता. त्यावेळी कोंबड्याची कुर्बानी देणारी व्यक्ती अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या सर्व घटनेत कोंबडा थोडक्यात वाचला.
पल्लवरमच्या पोझीचलूरमध्ये ही घटना घडली आहे. जेथे 48 वर्षीय टी लोकेश यांनी त्यांच्या बांधकामाधीन घरात पुजेचे नियोजन केले होते. यादरम्यान, त्यांनी बळी देण्यासाठी एक कोंबडा आणला होता. बळी देण्याचे काम येथे राहणाऱ्या राजेंद्रन नावाच्या व्यक्तीला देण्यात आले होते जो बळी देण्याचे काम करत होता. मात्र, बळी देण्यापूर्वीच राजेंद्रन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक कोसळला त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, या सर्व भानगडीत कोंबडा मात्र बचावला.
इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. त्यातच एका ठिकाणी लिफ्टसाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती. ज्यावेळी राजेंद्रन कोंबड्याला घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यावेळी त्याने चुकीने लिफ्टच्या मोकळ्या जागेत पाय ठेवला आणि तो खाली पडला. घटनेनंतर राजेंद्रन यांना त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राजेंद्रन गेल्या अनेक वर्षांपासून बळी देण्याचे काम करत होता.