पंढरपूर : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानंतर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी साहेब हे पक्षात पुन्हा सक्रीय झाले आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सावंत यांनी पंढरपुरात केलेली शिष्टाई यशस्वी झाल्यानंतर अन्य ठिकाणीही त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत. माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांना एकेकाळी टक्कर देणारे प्रा. सावंत यांनी पक्षात पुन्हा सक्रीय कामाला सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच, पक्षात त्यांची बढती होण्याचे संकेत आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रा. सावंत यांना मध्यस्थी करून प्रवासी वाहतूक सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद सुरु केला आहे. त्यानंतर आता प्रा. शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा शिवसेनेत पुन्हा सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लवकरच त्यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रा. शिवाजी सावंत शिवसेनेत सक्रीय झाल्यामुळे शिवसैनिकांचे मनोबल वाढले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत आणि जिल्हा शिवसेनेचे समन्वयक प्रा. शिवाजी सावंत हे पक्षापासून काहीसे अलिप्त होते, त्यामुळे पंढरपूरसह जिल्ह्यातील शिवसेनेला मिरगळ आली होती. राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही संघटना वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजी संपवून पक्षाला अधिक बळ मिळावे, यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीच प्रा. शिवाजी सावंत यांना अधिक ताकद देवून त्यांना सक्रीय करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर प्रा. सावंत यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पंढरपुरातील टाकलेली जबाबदारी प्रा. सावंत यांनी यशस्वी करुन दाखली आहे. अन्य ठिकाणी देखील त्यांचे एसटी कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे शिष्टाईचे प्रयत्न सुरु आहेत. सावंत बंधू पुन्हा जिल्ह्याच्या शिवसेनेत सक्रीय झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.