करमाळा (जि. सोलापूर) : राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा (Adinath Sugar factory) ताबा घेतला आहे. कारखाना १५ वर्षांपर्यंत भाडेतत्त्वावर देण्याचा जीआर आहे. ८ सप्टेंबर २०२० रोजीचे ते परिपत्रक आहे. मात्र, राज्य बॅंकेने तो २५ वर्षांसाठी बारामती अग्रो तत्वावर कसा दिला, याची आम्हालाही कल्पना नाही. आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याचा करार अद्यापही पूर्ण झालेला नाही. कारखाना २५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाबाबत एमएससी बँकेला विचारले असता त्यांनी ‘पंधरा वर्षांच्या भाडेतत्त्वासाठी कोणीही टेंडर भरलेले नाही. बारामती ॲग्रोने २५ वर्षांसाठीचे टेंडर भरल्याने त्यांना भाडेतत्त्वावर दिला आहे, असे बॅंकेकडून सांगण्यात आले, असा गौप्यस्फोट बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी केला.
करमाळ्यात गुरुवारी घेण्यात अलेल्या पत्रकार परिषदेत रश्मी बागल बोलत होत्या. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काही दिवसांपूर्वी आदिनाथमधील साहित्य मकाई कारखान्यात नेल्याचा आरोप केला होता. ते सर्व आरोप रश्मी बागल यांनी या वेळी फेटाळून लावले. त्या म्हणाल्या की आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून बागल गटाचे राजकीय खच्चीकरण करण्याचे काम कायम विरोधकांनी केले, अजूनही ते सुरूच आहेत.
आदिनाथची साखर बाहेर काढत असताना दोन वर्षांपूर्वी कामगारांच्या महिला अंगावर सोडल्या होत्या. कामगाराचे पगार २०१४ ते २०१५ पर्यंत नियमित होत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये आदिनाथ कारखान्याचे गाळप बंद झाले. (स्व). माजी राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांनी २००१ मध्ये कारखाना कर्जमुक्त केला होता . त्यामुळे आदिनाथ मृत होईल, आदिनाथ कुजून जाईल, अशी भाषा कुणीही वापरू नये . आदिनाथ कारखाना कधीही मृत होऊ शकत नाही, असेही रश्मी बागल यांनी विरोधकांना सुनावले.
रश्मी बागल म्हणाल्या की, राज्य सहकारी बँकेने कारखाना ताब्यात घेतला . मात्र, कुठलीच कार्यवाही केली नाही. एका बाजूला व्याजही सुरू आहे आणि पुढची कार्यवाही होत नाही . त्यासंदर्भात आमचे बॅंकेशी बोलणे झाले आहे. ता. २० मार्च २०२२ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये, हा झालेला ठराव महत्त्वाचा आहे. काहीही झाले तरी आम्ही सभासदांबरोबर आहे. एक कारखाना दुसऱ्या कारखान्याला वारंवार मदत करत असतो. आदिनाथ कारखान्यानेच मकाई कारखान्याला मदत केली, असे नाही. मी तेही नाकारत नाही. पण मकाईनेही आदिनाथला मदत केली आहे. आदिनाथ कारखान्याची १ कोटी ९६ लाखांची जीएसटी मकईने भरली आहे.
आदिनाथ सहकरी साखर कारखान्याला मदत मिळावी; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली आहे. कारखाना चालवण्यासाठी जो कोणी पुढे येईल, त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.