भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृती निमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भीमा सह साखर कारखाना लि, टाकळी-सिंकदर ता. मोहोळ येथे “भीमा केसरी” निकाली कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. कुस्ती शौकीनांना नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहता याव्यात तसेच या कुस्ती स्पर्धेतून सभासदांच्या मुलांनी प्रेरणा घ्यावी व स्थानिक नवं पैलवान घडावेत या उद्देशाने चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून भीमा केसरी या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. प्रमुख आकर्षण असणाऱ्या भीमा केसरी, भीमा कामगार केसरी, भीमा सभासद केसरी आणि भीमा साखर केसरी या ४ कुस्त्यांपुर्वी नोंद केलेल्या नवोदित पैलवानांच्या कुस्त्या होतील.
गतवर्षी झालेल्या भीमा केसरी स्पर्धेचं अतिशय चोख आणि नेटकं नियोजन करत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींना सुखद धक्का दिला होता. अगदी राज्यपातळीवर होणाऱ्या प्रमुख स्पर्धांच्या तोडीस तोड नियोजन करत भीमा केसरीला जिल्हास्तरावर नाही तर राज्यस्तरावर नावारूपाला आणलं. गतवर्षीचा भीमा केसरी विजेता सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी खिताब पटकवल्याने भीमा केसरी हि महाराष्ट्र केसरीची सेमीफायनल ठरली होती. भीमा केसरीची मानाची गदा उचलण्यासाठी यंदा चक्क महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर यांच्यात कुस्ती दंगल होणार आहे. त्यातच यावर्षी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत असा कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील कुस्ती शौकिनांचे लक्ष भीमा केसरीकडे लागून राहिले आहे.
१५ लाखांपेक्षा जास्तीच्या रकमेच्या बक्षिसांची लयलूट; असे असेल कुस्ती सामन्यांचं स्वरूप*
भिमा केसरी किताबासाठी – भीमा केसरी व महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी पै. प्रदीपसिंग जिरगपूर, भीमा कामगार केसरी – पै. प्रकाश बनकर विरुद्ध पै. विशाल भुंदू, भीमा सभासद केसरी – पै. माऊली कोकाटे, पै. गुरजीत मारगोड, भीमा साखर केसरी – महेंद्र गायकवाड विरुद्ध पै. दिनेश गोलिया
देशभरातून कुस्ती शौकीन येतील याचा विचार करून भव्य प्रेक्षक गॅलरी – चेअरमन विश्वराज महाडिक
भीमा केसरीसाठी यावर्षी गतवेळचा भीमा केसरी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूर यांच्यात कुस्ती होणार आहे. लाल मातीत होणाऱ्या कुस्त्या पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून कुस्ती शौकीन येणार आहेत. सर्वांना विनाअडथळा कुस्ती पाहता यावी यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी तयार केली आहे.
भीमा केसरी २०२४: निकाली कुस्त्यांचा थरार रंगणार! पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत लढतीमुळे स्पर्धा देशभरात गाजणार