लखनौ – भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, गाझियाबादमधील लोणी येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेले नंदकिशोर गुर्जर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मतदारसंघ परिसरात मांसाचे एकही दुकान दिसू नये, हे लोणीच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. लोणीत रामराज पाहिजे, म्हणून दूध तूप खा आणि दंड बैठका करा असे त्यांनी म्हंटले आहे.
यापूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान नंदकिशोर गुर्जर हे त्यांच्या वक्तव्यामुळे निशाण्यावर आले होते. जानेवारीमध्ये लोणीच्या बहेटा हाजीपूर गावात निवडणूक प्रचारादरम्यान अलीचे नाव घेणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच समाजवादी पक्षाचा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला होता.
गुर्जर म्हणाले होते, “अलीचे नाव घेणाऱ्यांना लोणी सोडावे लागेल… या निवडणुकीनंतर लोणीत पूर्ण रामराज्य येईल.” समाजवादी पक्ष हा ‘पाकिस्तानी पक्ष’ असल्याचा दावा त्यांनी केला होता.
UP मध्ये विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपने 255 जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाच्या खात्यात 111 जागा आल्या आहेत. याशिवाय अपना दल (सोनेलाल) 12 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला 2 आणि बसपाला फक्त 1 जागा मिळाली आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल यांना 6-6 जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलाच्या खात्यात 8 आणि जनसत्ता दल डेमोक्रॅटिकने 2 जागा जिंकल्या आहेत.