राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांची नावे पुढे आली. मात्र, त्यांना तेवढा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आल्याचे दिसून येत आहे. त्यातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले असून विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी शिंदे सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, दिल्लीतून पक्षश्रेष्टींचा निरोप आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला पोचले आहेत. आता त्यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरु आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. येत्या १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे.
राष्ट्रपदीपदासाठी भाजपकडून उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील निवडणुकीप्रमाणे चर्चेतील नावापेक्षा वेगळे नाव काढल्यास आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सर्वसमावेश असा उमेदवार शोधला जात आहे. त्यासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले. रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. सोमवारी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राष्ट्रपतीची निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली. पण, सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या पक्षासाठी महेनत घेत आहेत. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे यापूर्वीच भाजपमध्ये दाखल होऊन केंद्रीय मंत्री झाले आहेत. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट धरली असून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेकजण राजकारणापासून अलिप्त असल्याची स्थिती आहे. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ‘ईडी’ लागली आहे. अशा परिस्थितीत सुशिलकुमार शिंदे यांचा पक्षाला आधार वाटत आहे.