‘ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी स्वेरीच्या वतीने उघडलेल्या या मार्गदर्शन कक्षाचा बारावी उत्तीर्ण झालेल्या व उच्च शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फायदा होणार आहे याचा मला विश्वास आहे. मी स्वेरीचे व डॉ. बी.पी. रोंगे सरांचे नाव खूप ऐकून आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सातत्याने व यशस्वीपणे करत असताना अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा फायदा झाला आहे. माझ्या महाविद्यालयात शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे स्वेरीमध्ये शिकून त्यांचे करिअर यशस्वी केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी स्वेरीत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. डॉ. रोंगे सरांचे व स्वेरीचे कार्य अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.
या सर्व कारणांमुळे स्वेरीतील हा मार्गदर्शन कक्ष विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य दिशा देवून करिअरसाठी लाभदायी ठरणार आहे.’ असे प्रतिपादन अनगर (ता.मोहोळ) येथील कै.शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. चंद्रकांत ढोले यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष (पदवी), पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी (एमटेक), एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वेरीज् कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (अॅटोनॉमस) मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची आज स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य प्रा. चंद्रकांत ढोले मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांनी १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत आहेत. प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे साहजिकच प्रत्येक वर्षी स्वेरीच्या यशाचा आलेख देखील उंचावत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी, एमबीए व एमसीए या विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशिप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असणारी कमवा व शिका योजना अशा विविध बाबीसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मार्गदर्शन कक्षात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे. यामुळे एकाच छताखाली सर्व अचूक माहिती मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड/ क्षमता, पालकांची निवड आणि प्राध्यापकांशी असणारा समन्वय/संपर्क या बाबी या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वेरी संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष व पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, त्यांची पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोण-कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात व तपासाव्यात, कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँचची निवड, मागील वर्षातील विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर संबंधित गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे.’ स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (अॅटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची गरज का आहे? हे स्पष्ट करताना म्हणाले की, ‘विद्यार्थी व पालकांचा अभ्यास, विचार आणि मानसिकता तसेच डिजिटल टेक्नोलॉजीचा विपरीत परिणाम होऊ नये व वस्तुस्थितीची जाणीव व्हावी. मनाचा गोंधळ उडू नये व करिअरच्या दृष्टीने एक ठोस निर्णय घेता यावा यासाठी या कक्षाची निर्मिती केली आहे. एकूणच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा मार्गदर्शन कक्ष विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल.
या संदर्भात अधिक माहितीसाठी मोबा. क्र. ९५९५९२११५४ व ८९२९१००६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कक्षाच्या उदघाटन प्रसंगी डॉ.प्रशांत कुलकर्णी, प्रा.सोमनाथ ढोले, तज्ञ प्राध्यापक वर्ग व पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.