स्वेरीच्या नम्रता घुले यांना गोल्ड मेडल क्रीडाभारती तर्फे आयोजिलेल्या स्पर्धेत घवघवीत यश..!

क्रीडा भारती, सोलापूर व विश्वकर्मा क्रिडा समिती जनता बँक सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा महाविद्यालयामध्ये दिवाळी स्पोटर्स फेस्टिव्हल- २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी नम्रता दिगंबर घुले यांनी अंतिम सामन्यात अप्रतिम खेळी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शैक्षणिक गुणवत्ता, प्लेसमेंट, वार्षिक परीक्षांचे निकाल, मानांकने आणि प्रवेशसंख्या यामध्ये अग्रेसर असलेली ‘स्वेरी’ आता क्रीडा क्षेत्रात देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. सोलापूर मध्ये नुकत्याच झालेल्या ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारामध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या नम्रता घुले यांची कामगिरी चमकदार राहिली. अंतिम सामन्यात त्यांनी पहिला सेट १०-११ असा जिंकला तर दुसरा सेट ११-९ असा जिंकला. ‘सेपक टकरा’ हा मैदानी क्रीडा प्रकार डोके व पायाचा वापर करून खेळला जातो. यापुर्वी देखील नम्रता घुले यांना टीम इव्हेंट, रेग्यु व डबल या प्रकारात तिहेरी गोल्ड मेडल मिळाले होते. नम्रता घुले हया चिचुंबे (ता.पंढरपूर) येथील असून त्यांना लहानपणापासून या खेळाची आवड आहे. मंगळवेढ्यातील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असलेल्या स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागात प्रथम वर्षात त्यांनी प्रवेश मिळविला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व क्रीडा प्रशिक्षक दीपक भोसले, क्रीडा विभागाचे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या खेळाचा सराव सुरूच ठेवला. खेळात मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सुवर्णपदकांपर्यंत मजल मारली असून ‘माझ्या यशात गुरुजन वर्गाबरोबरच आई सौ. वंदना, वडील दिगंबर, चुलते सुरेश, काकी सौ. सविता व लहान बहीण भक्ती यांचेही प्रोत्साहन लाभते’ असे नम्रता घुले यांनी आवर्जून सांगितले.

ग्रामीण भागात राहून शेतकरी घराण्यात जन्म घेतलेल्या नम्रता यांनी ‘सेपक टकरा’ या क्रीडा विभागात तब्बल २८ सामन्यांमध्ये यश मिळविले आहे. नम्रता घुले ह्या नागपूर, कुरनूर व हैद्राबाद या दोन ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकलेल्या आहेत. सुवर्णपदक मिळविलेल्या नम्रता घुले यांचा संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी नम्रता घुले यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *