गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित, स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) मधील विद्यार्थ्यांनी जेजुरी (जि.पुणे) येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साईवेद फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नुकतीच भेट दिली.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या औद्योगिक व शैक्षणिक भेटीमधून विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीतील कामकाज कसे असते याबद्धल माहिती व्हावी या हेतूने या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. या भेटीमधून फार्मसीच्या विद्यार्थ्याना विविध औद्योगिक केंद्रांना लागणारे औषध क्षेत्रातील साहित्य, औद्योगिक क्षेत्रातील कच्चामाल आणि पक्का माल, ट्रान्सपोर्ट व विक्री, किरकोळ विक्री आदीबाबत माहिती मिळाली. तसेच कंपनीच्या विविध विभागांच्या प्रमुखांनी रॉ मटेरियल, प्रोडक्शन, कॉलिटी कंट्रोल, क्वालिटी एन्शुरन्स आणि पॅकेजिंग यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित संकल्पनेच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह वास्तविक कामकाज व औद्योगिक वातावरणाचा मोठा परिचय देतात.
व्यतिरिक्त औद्योगिक भेटी, सैद्धांतिक शिक्षण व व्यावहारिक एक्सपोजर मधील वाढणारी दरी कमी करतात. वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाण्याच्या हेतूने औद्योगिक भेटी विद्यार्थ्यांना बाजारातील सध्याची गरज, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोठा हातभार लावतात. या औद्योगिक भेटीमुळे इंडस्ट्रीबद्दल विद्यार्थ्यांना असणारे कुतूहल आणि शंकांचे निरसन झालेले पाहायला मिळाले. सदर औद्योगिक भेटीस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जालिंदर देशमुख यांनी भेटीस परवानगी दिली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार आणि फार्मसी (डिप्लोमा) विभागप्रमुख प्रा. जे.बी.कंदले यांचे मार्गदर्शन लाभले. या औद्योगिक भेटीसाठी प्रा. वैभव गायकवाड, प्रा. शुभांगी कागदे, प्रा. कीर्ती महामुनी या शिक्षक-शिक्षिकांसहित डिप्लोमा फार्मसी मधील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते.