सध्याच्या काळात अनेक प्रकारे दान केले जाते. त्यातून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे, हे मात्र कबुल करावेच लागेल. कारण रक्तदान केल्याने गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे. यासाठी प्रत्येकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ.आशा घोडके यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना दिवस’ उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ.आशा घोडके या मार्गदर्शन करत होत्या. ‘राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना दि. २४ सप्टेंबर १९६९ साली झाली. तेंव्हापासून एन.एस.एस. मधील सहभागी विद्यार्थी हे विविध समाजोपयोगी कार्यात सहभागी होऊन आपले योगदान देत असतात. प्रत्येक वर्षी २४ सप्टेंबरला एन.एस.एस. तथा ‘राष्ट्रीय सेवा योजना’ दिवस साजरा केला जातो. ‘शिक्षण आणि सेवा’ या वृत्तीला जोपासत स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वेगवेगळ्या सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाकडून रक्तदान शिबिर व वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले. फार्मसीचे शिक्षण हे आरोग्याशी संबंधित असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.
रक्तदान हे श्रेष्ठदान’ या सर्वश्रुत विचारांचा पुरस्कार करत स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…..’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ‘वृक्ष’ हेच आपले ‘सगे सोयरे’ आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते फार्मसी कॅम्पसमध्ये विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यामध्ये अश्वगंधा, कोरफड, आवळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधोपयोगी वनस्पतींचा समावेश आहे. फार्मसी मधील ‘फार्माकोग्नोसी’ या विषयांतर्गत या औषधी वनस्पतींबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना नियमित मिळते. या वृक्षारोपणामुळे अगोदर पासून असलेल्या औषधी बागेमध्ये या नव्या औषधी वनस्पतींची भर पडली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली रा.से.यो. विद्यार्थी प्रतिनिधी विश्वजीत कदम व सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढीचे तांत्रिक सहाय्यक सुधीर भातलवंडे, पंढरपूर पंचक्रोशीत अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या डॉ.बी.पी.रोंगे हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे, फार्मसीचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.