गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वेरीतील शैक्षणिक संस्कृती व सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली हा पालक मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एस.जी.कांबळे तसेच महिला पालक प्रतिनिधी सौ.दीप्ती गडम तसेच श्रीकांत बिस्किटे हे उपस्थित होते.
प्रास्तविकात प्रा.प्रदीप जाधव यांनी महाविद्यालयाची, उच्च शिक्षित प्राध्यापकांची, उपलब्ध साहित्य साधनांची माहिती करून देताना महाविद्यालयात उपलब्ध सोयी, सुविधा, कमवा आणि शिका योजना, रात्र अभ्यासिका, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, बसेसची सुविधा, १०२४ एम.बी.पी.एस. लिज लाईन क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट आयव्ही अर्थात इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी आवश्यक बाबींची माहिती दिली. प्रमुख पाहुणे एस.जी.कांबळे म्हणाले की,‘विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनच्या संधी उपलब्ध करून त्यांना फॉरेन एज्युकेशनबद्दल आवड निर्माण होण्याबाबत प्रयत्न करावेत.’ सौ.दीप्ती गडम म्हणाल्या की, ‘स्वेरीत डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पाल्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर देखील उज्वल होत आहे.’ प्राचार्य डॉ.मणियार म्हणाले की, ‘विद्यार्थी व पालकांनी या महत्वाच्या शैक्षणिक वर्षात काळजी घ्यावी.
पालकांनी वेळोवेळी आमच्या प्राध्यापकांशी संवाद साधून पाल्याची प्रगती जाणून घेतल्यास पाल्य अधिक जागरूक राहून अभ्यास करू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या विश्वासामुळे आम्हाला ज्ञानदान करण्यासाठी अधिक बळ मिळते.’ असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल अथवा शैक्षणिक शंका, अडचण असल्यास त्वरीत संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले. यानंतर अनेक पालकांनी महाविद्यालय आणि संस्थेच्या शिक्षणप्रणाली बाबत समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. त्यात डॉ.जाधव यांनी स्वेरीची शिस्त व मुलींच्या सुरक्षितेबद्दल कॉलेजची प्रशंसा केली. कार्यक्रमानंतर पालकांनी आपल्या पाल्यांचे वर्गशिक्षक व प्राचार्यांच्या भेटी घेवून पाल्याच्या प्रगतीबाबत विचारणा करून अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयात ‘फार्मासिस्ट डे’ निमित्त घेतलेल्या विविध कौशल्यात्मक स्पर्धांची प्रमाणपत्रे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास १५० पालक, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.ए.आर.चिक्काले यांनी केले, प्रा.जी.बी.कंदले यांनी आभार मानले तर प्रा.एस.डी.तोरसकर यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहीले.