गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘एम्पॉवरिंग इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी अँड इंटिग्रेशन’ या विषयावर दि. १७ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान सहा दिवसीय ‘अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ चे आयोजन करण्यात आले होते. या ‘अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ला प्रचंड प्रतिसाद लाभला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. सदर एफ.डी.पी. ची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रारंभी संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी.केने यांनी या उपक्रमाचे महत्व सांगून सर्व उपस्थित मान्यवर व सहभागी प्राध्यापक यांचे स्वागत केले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी यांनी या सहा दिवसीय एफ. डी. पी. अंतर्गत विविध बाबींची रूपरेषा सांगितली तसेच विभागाबद्दल अधिक माहिती दिली. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे भविष्यातील महत्त्व सांगून एफडीपी मुळे संशोधनास चालना मिळत असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सन अँड टेक्नॉलॉजी, पुणेचे तांत्रिक व्यवस्थापक रोहन दोशी यांनी ‘एक्सप्लोरिंग डिफरंट इलेक्ट्रिक व्हेईकल्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात डिझाईन टेक सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे एप्लीकेशन इंजिनिअर कुणाल खंडेलवाल यांनी प्रात्यक्षिक देवून बॅटरी मॉडेलिंग आणि एस्टिमेशन बद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात टेक्नोप्लायर पीसीबी डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे संस्थापक संचालक रोहन यादव यांनी पीसीबी डिझाईन फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दल आपले अनमोल विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात के.के.वाघ इन्स्टिट्यूट, ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ.पी.बी.कुशारे यांनी ‘डिझाईन अँड ऍटोमेशन ऑफ मोनो सायकल चासिस फॉर इफेक्टीव्ह बॅटरी स्वॅपिंग’ मधील विविध संकल्पना सांगितल्या. तिसऱ्या सत्रात नागपूर येथील डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वायसीसीइचे डॉ.प्रफुल्लचंद्र मेश्राम यांनी ‘मल्टी लेवल इन्व्हर्टर इन इलेक्ट्रिक व्हेईकल’ बद्दल सविस्तर माहिती दिली. एफडीपीच्या चौथ्या दिवशीच्या सत्रात अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. बेडेकर यांनी ‘जेनेटिक अल्गोरिदम आणि त्याचे एप्लीकेशन’ याबद्दल माहिती दिली. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जळगाव मधील शासकीय महाविद्यालयाचे डॉ. अशोक मतांनी यांनी ‘गव्हर्नमेंट रेगुलेशन आणि आय ट्रीपल ई स्टॅंडर्ड आणि स्पेसिफिकेशन’ चे महत्व सांगितले. या एफ.डी.पी. चाच एक भाग म्हणून दुसऱ्या सत्रात सोलापूर येथील लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड या ‘इंडक्शन मोटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ला व माचनूर (ता.मंगळवेढा) येथील स्पार्टन टेक्नॉलॉजी या सोलार आधारीत कंपनीला औद्योगिक भेट देण्यात आली. सहाव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पुणे येथील पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि जी.के.पी.आय.एम.च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश ठाकरे यांनी ‘सोलार पॉवर इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन डिझाईन टेक्नॉलॉजी चॅलेंजेस’ बद्दल चांगली माहिती दिली. दुसऱ्या सत्रात फीडबॅक सेशन आणि परस्पर संवादसत्र संपन्न झाले. यामध्ये विविध महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वेरी व इतर महाविद्यालयातील जवळपास ६० हुन अधिक प्राध्यापक उपस्थित होते. या एफ.डी.पी.साठी समन्वयक डॉ.मोहन ठाकरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.डी.डी.डफळे आणि डॉ.नितिन कौटकर यांनी केले तर आभार डॉ. ए.पी.केने व प्रा. रंजना खंडेभरड यांनी मानले.