स्वेरीमध्ये मेसा तर्फे तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सचे प्रदर्शन उत्साहात संपन्न..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांकडून तांत्रिक मॉडेल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ‘मेसा’ तथा ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटस असोसिएशन’ च्या माध्यमातुन सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या तांत्रिक प्रदर्शनाचे उदघाटन स्वेरी अभियांत्रिकीच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अमरजित केने यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचा आनंद घेतला.

प्रदर्शनात अवजड वाहनांचे विविध पार्टस, सैन्यातील रणगाडे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, तसेच नुकत्याच झालेल्या ‘चांद्रयान-३’ च्या ऑर्बिट व लँडर यासारख्या अत्याधुनिक मॉडेल्सचे प्रदर्शन भरवले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी दि.१४ ते दि.१६ सप्टेंबर या तीन दिवसात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमास पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन तंत्रज्ञान विषयी माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञानाविषयी आणखी जिज्ञासा निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी मधील विविध शाखांची पायाभूत माहिती दिल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे स्वेरीतील विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. या प्रदर्शनामध्ये संरक्षण विभागात महत्त्वाची भूमिका बजावणारे रणगाडे व त्याचे नमुने तसेच वीज निर्माण करणारा हायड्रोलिक पॉवर प्लांट, भारताचे माजी राष्ट्रपती व दिवंगत शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे सात प्रकारचे मिसाईल व त्यांचे विविध नमुने, तसेच याचा वापर कुठे कुठे करण्यात आला याची सविस्तर माहिती देणारे पोस्टर्स या प्रदर्शनात होते. नवीन तंत्रज्ञानाची माहिती, मोठ मोठी जहाजे, लढाऊ विमाने यांचे मॉडेल्स तयार करून संपूर्ण विभाग तंत्रमय बनवण्यात आला होता. शेतीसाठी लागणारी आधुनिक उपकरणे विद्यार्थ्यांनी अत्यंत कौशल्याने बनवली होती. विभागाच्या विविध ठिकाणी रांगोळी, रंगबेरंगी फुले लावण्यात आली होती.

यावेळी ‘मेसा’च्या विद्यार्थी अध्यक्षा आरती चौगुले, अभिषेक मोर्डे, अंकिता हिंगमिरे, नानासो चौगुले, सत्यजित गोफणे, अभिषेक गुरव, सृष्टी इंगळे, ऐश्वर्या वाघमारे, साक्षी चौगुले, साक्षी भोसले, प्रणाली पराडे, दिग्विजय बुर्रा, साक्षी काळे, ऐश्वर्या पाटील, प्रतीक्षा चौगुले यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.एस.बी. भोसले, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर. गिड्डे, डॉ.एस. एस.वांगीकर, डॉ.नितिन कऊटकर व मेसाचे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्यासह इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्तम रित्या पार पडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *