पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बेंगलोर येथील प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नेट सेलर बी यु लोड सॉफ्टवेअर ग्रुपचे प्रमुख सौरभ सरदेशमुख यांनी ‘सायबर सेक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात वेगाने पुढे जात असताना संगणकाबद्दलची माहिती अद्ययावत करणे गरजेचे असून संगणकाच्या वापराने जेवढे फायदे होतात, तेवढेच नुकसान देखील होऊ शकते यासाठी संगणकाची सुरक्षा विचारात घेणे गरजेचे आहे. यावेळी पाहुण्यांनी कोणत्या प्रकारचे ऑनलाइन गैरव्यवहार होऊ शकतात ? याची माहिती दिली. बँकिंगचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची, ओटीपी कसा येतो तसेच आलेल्या लिंकची खात्री करूनच पुढील प्रक्रिया कराव्यात, असे प्रतिपादन केले.
ई-मेल आणि इतर सोशल मीडियाचे अकाउंट वापरताना नेमकी काय सुरक्षितता घ्यायची? याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांनी ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ का साजरा करायचा? याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी संगणक सुरक्षिततेच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले असता प्रमुख पाहुणे सरदेशमुख यांनी सर्वांची समाधानकारकपणे उत्तरे दिली.