माघी वारीत स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रासोबत समाजप्रति बांधिलकी जोपासण्याचा केला प्रयत्न

वारी दरम्यान पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यावर्षी माघ वारीत वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे ‘तीर्थक्षेत्र पोलीस: माघी वारी २०२३’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने व प्रशासनावर येणारा अधिकचा ताण कमी करण्याकरिता वारी काळात ‘स्वेरी’ नेहमीच कार्यरत असते.

स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील २० प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० विद्यार्थ्यांनी दि.३१ जानेवारी २०२३ ते दि.२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत माघ वारी व्यवस्थापन कार्यात सहभागी होवून पोलीस प्रशासनाला अनमोल सहकार्य केले.
यावेळी ‘पोलीस मित्र’ म्हणून कार्य करत असताना स्वेरीचे विद्यार्थी पंढरपूर शहरात महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांचे नातेवाईक शोधण्यात मदत करत होते. तसेच गर्दी नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांचे समूह कार्य करत होते. शहरातील प्रमुख गजबजलेल्या ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट परिसर या महत्त्वाच्या परिसरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते वारकऱ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करत होते.

स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा ताण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला. स्वेरी स्थापनेपासून शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात देखील नित्य योगदान देत असते. स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी महत्वाच्या वारी काळात दर्शन रांगेतील वारकऱ्यांना पाणी वाटप, निर्मल वारी, पोलीस मित्र, स्वच्छता मोहीम, औषध वाटप, आरोग्य तपासणी पथनाट्याद्वारे जनजागृती अशा विविध उपक्रमांतून सामाजिक योगदान देत आहेत. यामुळे स्वेरीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली, बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती यांच्या सहकार्याने स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी या सेवेत सहभागी झाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *