आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्भलिंग निदान प्रकरणात गाजलेले बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पाठवून भूम येथील ३० वर्षाच्या तरुणाने बुधवारी पहाटे आत्महत्या केली. फैय्याज दाऊद पठाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी यांच्या खासगी वाहनावर चालक होता. या डॉक्टरच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला. त्यानंतर फैय्याजने पानटपरी सुरू केली. पुन्हा कामावर ये अन्यथा स्वामी यांचे पैसे परत कर, अशी धमकी सुरेश कांबळे व त्याचे साथीदार देत होते. त्यातून ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते.सुरेश कांबळे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी फैय्याज पठाण यांच्या नातेवाईकांची मागणी आहे.