गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)शी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदविका अभियांत्रिकीच्या जवळपास १५० विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.
शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विधायक, सामाजिक उपक्रमात स्वेरी नेहमीच हिरीरीने सहभाग घेत असते. ‘अभियंता दिना’ च्या निमित्ताने स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’ अंतर्गत या ऐच्छीक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.आकाश पवार, प्रा. सुरज पवार, प्रा. पी. एस गवळी, प्रा.एस.व्ही.सराफ, प्रा. आर. एस. पाटील व प्रा.आर.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले.
शिबिराचे उदघाटन ब्लड बँकचे सचिव अमजदखान पठाण यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ व इतर प्राध्यापकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन ब्लड बँके तर्फे रक्त तपासणी, हिमोग्लोबिन व रक्तगट अशा तपासण्या मोफत स्वरुपात करण्यात आल्या. यामध्ये डिप्लोमा इंजिनिआरिंगचे विद्यार्थिनी व प्राध्यापिका असे मिळून एकूण ५० जणांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या रक्तपेढीच्या माध्यमातून पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व प्राध्यापक असे मिळून जवळपास १५० जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी संबंधित रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.