सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी) दुपारी 2 नंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात कल्याणराव काळे यांनी पुढे म्हटले आहे, स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. यंदाचे 18 वे वर्ष असून, आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी वसंत केसरी कुस्ती आखाडा गाजवलेला आहे. यावर्षी 86 किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या ओपन गटामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास एक लाख एक हजार रुपये रोख बक्षीस व चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या पैलवानास 51 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 25 हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकास 11 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जाणार असून या कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत.
मल्ल सम्राट पैलवान रावसाहेब मगर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन धनाजी मदने करणार असून महाराष्ट्र कर्नाटक हलगी फेम सुनील कागल यांच्या हलगीच्या खणखणाटात कुस्त्या निकाली निघणार आहेत. पंच म्हणून धनराज भुजबळ व संतोष पाटील काम पाहणार असून, कल्याणराव काळे बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्यावतीने आयोजित या भव्य कुस्ती मैदानास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, हितचिंतक,कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कल्याणराव काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे आणि संचालक मंडळाने केले आहे.