शिक्षक आणि पालक यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल – पालक प्रतिनिधी सोमनाथ नागणे

स्वेरीमधील आदरयुक्त शिस्तीमुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडत असतात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय जडते. त्यामुळे आमच्या पाल्यानी स्वेरीतच शिक्षण घ्यावे असे आम्हा पालकांना असे वाटते. स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार घडवले जातात. त्यामुळे विद्यार्थी हा बाहेरील जगात स्पर्धा करण्यासाठी सज्ज होतो. एकूणच स्वेरीच्या माध्यमातून पालकांपर्यंत अखंड धागा जोडला गेलेला आहे. स्वेरीचे शिक्षक आणि पालक यांच्यातील संवादाचा विद्यार्थ्यांच्या करिअर वर परिणाम जाणवतो आणि विद्यार्थी उज्वल यश संपादन करतात.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी सोमनाथ नागणे यांनी केले.

येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग व इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या विभागांच्या पालक मेळाव्यात सोमनाथ नागणे हे बोलत होते. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून किशोर हुके, पुण्यातील उद्योजक प्रशांत जवळकर तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. कल्पना हुके व सौ. वर्षा धर्माधिकारी हे देखील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी पालकांचे स्वागत करून महाविद्यालयाची संपूर्ण माहिती दिली. कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. पी.एस. भंडारे व इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीचे विभागप्रमुख प्रा. जी.एस. मिसाळ यांनी आपल्या विभागांची सर्व माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणारी ‘कमवा आणि शिका’ योजना, प्ले ग्राउंड, जिमखाना, एन.के.एन. प्रणाली, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच उच्चशिक्षित शिक्षकवर्ग, रात्र अभ्यासिका आदी बाबत सविस्तर माहिती दिली. गतवर्षीच्या परीक्षेत ९० टक्केहून अधिक गुण मिळविलेले ५५ गुणवंत विद्यार्थी तसेच झोनल स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी पाहुण्यांकडून सत्कार करण्यात आला. याच बरोबर अभिमन्यू कदम, प्रशांत जवळकर या पालकांनी काही सूचना आणि प्रश्न उपस्थित केले.

प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. पालक विठ्ठल साळुंखे म्हणाले की, ‘ शिक्षण तर सर्वच जण देतात परंतु ‘संस्कार’ आणि ‘शिस्त’ फक्त याच स्वेरी महाविद्यालयातून मिळतात. त्यामुळे याठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा लागते आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांवर येथे होत असलेले संस्कार फलदायी आहेत.’ सौ. वर्षा धर्माधिकारी म्हणाल्या, ‘आपल्या शिक्षण पद्धतीतून सर्वांचा विकास होत असताना परिश्रम करण्याची सवय विद्यार्थ्यांना जडते. ही बाब खूप महत्वाची आहे. तसेच येथील शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यांच्या अपेक्षांची पूर्तता, सर्व सोयी-सुविधा, ट्रिपल पी.ई., प्राध्यापकांचा अभ्यासासाठी पाठपुरावा व गुणवत्ता वाढीसाठी सततचे प्रयत्न, हे देखील खूप महत्वाचे आहे.’ यावेळी जवळपास २०० पालक, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्नेहा माने, कीर्ती पाटील सृष्टी नारायण व स्नेहल जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर रुही तेंडुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *