पंढरपूर- ‘स्वेरीमधील शैक्षणिक वातावरण हे संशोधनासाठी उपयुक्त असून या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. सध्याच्या जागतिक बाजारपेठेत औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत परंतु तंत्रज्ञान हे दोन-तीन वर्षात बदलत राहते. अशा स्थितीमध्ये आपल्याला खूप नवीन संधी निर्माण होतात. कंपनीत कार्य करताना आपल्याला मिळालेल्या मार्कापेक्षा आपल्यातील गुणवत्ता अधिक महत्वाची असते. यासाठी आपण हाती घेतलेल्या कार्यात एकाग्र राहून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. त्यातूनच नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यामध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करा कारण नोकरी करत असताना घर ते ऑफिस एवढाच प्रवास राहतो, परंतु उद्योग धंद्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नवनवीन व्यासपीठ मिळत असते ज्याचा भविष्यात फायदा होत असतो.’ असे प्रतिपादन आयट्रिपलई अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स, मुंबईचे चेअरमन आनंद घारपुरे यांनी केले.
आयट्रिपलई मुंबई सेक्शन स्टुडंट अॅक्टीव्हिटी आणि आयट्रिपलई स्टुडंट ब्रँच, स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ एप्रिल २०२४ रोजी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे तीन विभाग व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने आयोजिलेल्या ‘टेक्नोव्हेशन २के२४’ या उपक्रमात आय ट्रिपलई, मुंबईचे चेअरमन आनंद घारपुरे हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे होते. दीपप्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी स्वेरीची स्थापनेपासूनची वाटचाल, संशोधनासाठी मिळालेला निधी, मिळालेली मानांकने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, ‘गेट’ या अवघड परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वेरीमध्ये असलेल्या सोई आणि सुविधा आदी बाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप, सहभागी विद्यार्थी व प्रोजेक्ट आदी बाबत माहिती दिली. पुढे बोलताना आयट्रिपलई, मुंबईचे चेअरमन घारपुरे म्हणाले की, ‘ ग्रामीण भागात असणाऱ्या गोपाळपूर मधील शिक्षण आणि डॉ.रोंगे सरांचे दिशादर्शक नियोजन यांचे कौतुक वाटते कारण येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच संशोधन करत असतो. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षात तंत्रज्ञानात बदल होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत बारकाईने अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रोजेक्टचे रुपांतर प्रॉडक्ट मध्ये करा. भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारतामध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादने तयार करणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. आयट्रिपलई विद्यार्थी प्रतिनिधी सानिका चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीमध्ये डॉ. प्रशांत पवार सरांचे आगमन झाले आणि त्यांनी संपूर्ण वातावरण संशोधनमय बनविले. आपले करिअर करताना कोणत्याही ठिकाणी जा, कठीण परिश्रम हे करावेच लागतात. शिक्षण हा करिअरचा पाया आहे आणि तो सर्वप्रथम भक्कम केला पाहिजे. यासाठी स्पर्धेत विजेते होण्यापेक्षा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमासोबत आपण इतर स्पर्धांमध्ये सहभाग घेवून आपला सर्वांगिण विकास करणे ही काळाची गरज आहे. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपण हे सिद्ध करू शकतो’ असे सांगितले. सायंकाळी पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी १२० प्रकल्प सादर केले होते. यामध्ये विजेत्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. विजेत्यांना येत्या दि.१८ एप्रिल रोजी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, संगमनेर मध्ये होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमासाठी पीएन अॅकड्मी व अक्षय ब्लड बॅंक, पंढरपूर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ.रोशन मक्कर, प्रा.आशिष माकडेय, प्रा. स्वप्नाली माकडेय, प्रभाकर कुमार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एस.पी.पवार. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी, तसेच तिन्ही विभागांचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेक्नोव्हेशनच्या समन्वयक डॉ.नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आयट्रिपलई विद्यार्थी प्रतिनिधी सुहास माळी यांनी आभार मानले.