शिवसेना आमदार तानाजी सावंत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता स्वतः सावंत यांनीच उत्तर दिलंय. तसेच आपण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा अफवा असून हे माझ्या विरूद्धचं कुभांड असल्याचा आरोप केलाय. “माझ्या विरुद्ध रचलेलं हे कुभांड आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीच पक्षाविरोधात बोललो नाही आणि मी असं काही बोललो असेल तर एक वक्तव्य दाखवा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल,” असं खुलं आव्हान शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी दिलं. ते पुण्यात पत्रकारांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.
तानाजी सावंत म्हणाले, “१९९० पासून माझं शिवसेनेविरूद्धचं एक वक्तव्य दाखवा. निवडणूक झाली तेव्हापासून आजपर्यंत मी पक्षाविरूद्ध केलेलं एक वक्तव्य मला दाखवावं. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये जाणार आहे ही फक्त एक राजकीय चर्चाच आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. आमच्या पक्षात आदेश चालतो. जबाबदारी द्यायची की, नाही हे पक्ष ठरवेल.”
“मी शिवसेना सोडणार नाही”
यावेळी तानाजी सावंत यांनी मी शिवसेना सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. ते पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. पत्रकारांनी सावंत यांना तुम्ही शिवसेना सोडणार अशी चर्चा मागील काही दिवसापासून सुरू असण्यावर प्रश्न विचारला होता.
मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाल महाल येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते तानाजी सावंत उपस्थित होते.