सोलापूर : बार्शी शहर व तालुक्यासह राज्यातील ठिकठिकाणच्या गुंतवणुकदारांना 18 कोटी 80 लाखांचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे अखेर पोलिसांना शरण आला. सोमवारी (ता. 17) पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर तो हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बार्शी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या विशाल फटेला शोधण्यासाठी व त्याने नेमके किती लोकांना किती कोटी रुपयास फसविले, याच्या चौकशीसाठी पोलिस अधीक्षकांनी ‘एसआयटी’ची स्थापना केली होती. त्यानंतर आज तो पोलिसांत शरण आला. कर्नाटकातून तो एसटीने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. सुरवातीला त्याला कोणीच ओळखले नाही. मी विशाल फटे म्हणून त्याने स्वत:ची ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून त्याला सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, तो इतके दिवस कुठे होता, तो फरार का झाला, याची चौकशी होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सातपुते यांनी दिली. फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो बंगळुरु व कर्नाटकात वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिसांतर हजर होण्यापूर्वी त्याच्यासोबत असलेली पत्नी व मुलीला नातेवाईकांकडे पाठविले आणि तो स्वत: पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
मोठ्या रकमेचे अमिष दाखवून पैसे गुंतवण्यास लोकांना भाग पाडून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून फटेचा शोध सुरु होता. परंतु, सोमवारी दुपारी त्याने व्हिडिओ तयार करून स्वत:हून पोलिसांत हजर राहणार असल्याची माहिती दिली होती. तो हजर होईल की नाही, याबाबत शंका होती, परंतु तो रात्री आठच्या सुमारास स्वत:हून हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला उद्या (मंगळवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
”विशाल फटेविरुध्द एक गुन्हा दाखल झाला असून त्याअंतर्गत जवळपास 50 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत त्याने 18 कोटींची फसवणूक केल्याचे दिसते. परंतु, त्याने नेमकी किती लोकांची आणि किती कोटींची फसवणूक केली, त्यामागे दुसरा कोणी आहे का, या बाबींच्या सखोल तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली जाईल.”
तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर