एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी आपण जात असल्याचं सांगत वडिलांनी घर सोडल्याच्या रागातून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार सोलापूरमध्ये घडलाय. संपात सहभागी होण्याचं सांगत वडिलांनी घर सोडले अन् २० वर्षीय मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. वडिलांनी घर सोडून एसटी संपात जात असल्याचं सांगितल्यानंतर त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून अमर माळीने गळफास लावून आत्महत्या केली.
कोंडी येथे हा दुर्दैवी प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीमध्ये आत्महत्येच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अमरचे दयानंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तो गेल्या काही दिवसांपासून शांत शांत होता, असं घरचे सांगतात. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यावर त्याच्या वडिलांनी म्हणजेच तुकाराम माळी यांनी, “माझे काम दोन-तीन महिन्यांपासून बंद आहे. मला पगार नाही. तुला पैसे कुठून देऊ?” असा प्रश्न अमरला विचारला.
या दोघांमध्ये थोडी शाब्दिक बाचबाची झाल्यानंतर वडील तुकाराम माळी हे एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले. अमर देखील रागाच्याभरात घराबाहेर गेला. त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होते. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला. मात्र अमरने, “नको, थोडा आराम करतो” म्हणत स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी अमर बाहेर आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्याचा आई खोलीजवळ जाऊन आवाज देऊ लागली. मात्र खोलीमधून काहीच आवाज येत नव्हता. आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला. शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
त्यानंतर अमरचा मोठा भाऊ अक्षयने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अमरला खाली उतरवले. अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
एसटी आंदोलनामध्ये असणाऱ्या तुकाराम माळी यांना त्यांच्या भावाने फोन करून घरी बोलावून घेतले. तुकाराम माळी हे घरी आले असता त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे समजले तेव्हा त्यांच्या भावनांचा बांध फुटला. “अमर हे तू काय केलेस? माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे नाही म्हणालो होतो,” असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले. प्रसारमाध्यमांशी बोलताना तुकाराम यांनी, “अमर मागील दोन महिन्यांपासून काहीतरी उद्योग सुरु करायचाय थोडे पैसे द्या असं सांगून माझ्याकडून पैसे मागत होता. पण दोन तीन महिन्यांपासून पगार झाला नसल्याने माझ्याकडे पैसे नाहीत असं मी त्याला सांगितलं होतं. या सर्व गोष्टीला सरकारच जबाबदार आहे. असे दोन तीन महिने पगार अडकवून ठेवले तर किती तरी लोक मरतील,” अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.
अमरने विज्ञान शाखेमधून बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. तो अभ्यासात हुशार होता. त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला, हे कळण्याचा काहीच मार्ग नसल्याची चर्चा त्याच्या मित्रांमध्ये आहे.