राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत..! झाले त्या निर्णयावर नाराज!

उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज वडाळा येथे बैठक झाली. माजी आमदार दिलीप माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीत काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची भूमिका मांडली, तर काहींनी पक्षात राहूनच माने गटाशी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे सांगितले. तर काहींनी काका साठे गट म्हणून कार्यरत राहण्याची तयारी असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते बळीराम साठे पक्षाला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

या वेळी धनाजी माने म्हणाले, ‘‘ऐन पडझडीच्या काळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारुन साठे यांनी पक्षाला जिल्ह्यात उभारी दिली. मात्र, दिलीप मानेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाला विरोध असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मानेंना प्रवेश देण्याचा घाट घातला आहे. हे कमी आहे काय म्हणून जयंत पाटील हे भाजपत जाऊन आलेल्या दीपक साळुंके यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतात आणि ज्येष्ठ निष्ठावंत साठेंना निर्णयप्रक्रियेत मात्र डावलतात.’’ प्रकाश चोरेकर यांनी काका साठे हाच आमचा पक्ष असून पक्ष बदलाचा अथवा इतर कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार साठे काकांना असून कार्यकर्ता म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या मागे असल्याचे सांगितले.

सर्वसामान्य जनतेची काम करणाऱ्या काकांना पदाची गरज नाही. आजारपणात झोपल्यावर जेवणासाठी उठत नाहीत, मात्र कार्यकर्ता भेटायला आला आहे म्हटलं की ते ताडकन उठून बसतात, हेच कार्यकर्ते साठेंची ताकद आहे. भविष्यात काहीही निर्णय होवो. उत्तर सोलापूर राष्ट्रवादी कार्यकर्ते काकांसोबत असणार आहे, असे जयदीप साठे यांनी म्हणाले. हरिदास शिंदे यांनीही काका साठेंचा निर्णय डावलून जर पक्ष अन्याय करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, ज्येष्ठ व निष्ठावंत नेते बळीराम साठे यांची ताकद दाखवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्ता काबीज करुनच पायात चप्पल घालणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस भैरवनाथ हावळे या कार्यकर्त्याने जाहीर करत चप्पल व्यासपीठावरच सोडून गेला. यावेळी वातावरण भावूक झाले होते.

यावेळी प्रकाश चोरेकर, उपसभापती जितेंद्र शिलवंत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, हरिदास शिंदे, शिवाजी पाटील, हणमंत गवळी, अनिल माळी, श्रीकांत मुळे, महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णा झाडे-खेलबुडे, सुनील भोसले, भाऊ लामकाने, दयानंद शिंदे, अमोल पाटील, पप्पू सुतार, रामराव माने, राजाराम गरड, बालाजी गरड, प्रभाकर गायकवाड यांच्यासह तालुक्‍यातील शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *