राज्यभरात काल धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सगळ्यांना हादरुन टाकणारी घटना घडली. आगर नांदूर येथील एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नितीन निर्मळ (वय 23 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सणाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
नितीनने ‘मिस यू माय फ्रेण्ड’, ‘बाय’, ‘शेवट’, ‘गुड बाय माय जिगरी’, सॉरी, असं स्टेटस ठेवलं आणि आत्महत्या केली. नितीनने ठेवलेले स्टेटस त्याच्या काही मित्रांनी पाहिलं आणि त्यानंतर त्याचा शोध सुरु असताना गावाजवळच एका लिंबाच्या झाडाला नितीनने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
नितीनने काल सकाळी धुळवड साजरी केली आणि दुपारच्या वेळी अचानक आपल्या व्हॉट्सअॅप वर miss you my friend, bye, goodbye my jigri,शेवट असे स्टेटस ठेवले. त्यानंतर नितीनच्या काही मित्रांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिले आणि याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मित्रांनी आणि नातेवाईकांनी नितीनचा शोध सुरु केला. काही वेळाने गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
यानंतर गावकऱ्यांनीनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. दरम्यान नितीनने व्हॉट्सअॅपवर असे स्टेटस कोणामुळे ठेवलं आणि आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र गावात शोककळा पसरली आहे.