माझ्या मुलीला चौकशीसाठी बोलवलं तरी ती आत्महत्या करेल- जितेंद्र आव्हाड

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़  या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या कारवाईची जोरदार चर्चा असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या मुलीसंदर्भात एक धक्कादायक वक्तव्य केलंय

मुलीला नुसतं चौकशीला बोलवलं तरी ती आत्महत्या करेल असं म्हटलंय. “तुम्हाला सेफ वाटतंय का?”, असा प्रश्न आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईनंतर विचारण्यात आला. आव्हाड यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, “मी तर काही चुका वगैरे केलेल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग बिपिंगमध्ये चुका असतील तर” असं म्हटलं.

“एकूण कुटुंबाच्या दष्टीने विचार करता…” असं विचारण्यात आलं तेव्हा प्रश्न पुर्ण होण्याआधीच आव्हाड यांनी, “मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते. रात्री तीन वाजता टक् टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते,” असं उत्तर दिलं. असं वाटतं का ईडी येतंय? यावर “आता कोणाच्या ध्यानी, मनी स्वप्नीच नाही ना कोणाच्या घरी कोण घुसेल. यात सर्वात जास्त हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी काही संबंध नसतो,” असं आव्हाड म्हणाले.

पुढे बोलताना आव्हाड यांनी, “आज ३८ वर्षे होत आले मी राजकारणात आहे. माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध आहे. पण आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल,” असं वक्तव्य केलं. “बापरे! हे फार मोठं वक्तव्य आहे तुमचं,” अशी प्रतिक्रिया महिला पत्रकाराने दिली. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “ते फ्री बर्ड्स आहेत ना त्यांना या असल्या सवयी नाहीत ना,” असं म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं नाव नताशा असं असून काही महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं आहे.

“पण मग तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय?,” असा थेट प्रश्न विचारला असता आव्हाड यांनी नकारार्थी मान डोलवली. पुढे बोलताना त्यांनी, “मला तर वाटतं तिने राहू नये, वातावरण इतकं गढूळ होत राहिलं आहे. मी करोनामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी तिची जी परिस्थिती बघितलेली तीच मला भितीदायक वाटत होती,” असं सांगितलं. “पण आता जर काही… माझ्या बाबतीत घडणार नाही याची मला १०० टक्के खात्री आहे, पण उद्या झालच तर मला पहिला मनात विचार येतो की माझ्या पोरीचं काय होईल,” असंही आव्हाड म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *