सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे. वाय. डी. शिंदे असे गटविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तर चुनीलाल देवरे असे सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचे नाव आहे. धुळे जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे हे 31 मार्च सेवानिवृत्त होणार होते. याबाबत आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. एवढेच नाही तर या कार्यक्रमाच्या पत्रीकांचे देखील वाटप करण्यात आले होते. परंतु, सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिताफीने ताब्यात घेतले. गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे या कर्मचाऱ्याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील अर्जदार हे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन आज लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. तक्रारदार यांची पीएफ कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी वाड. डी. शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपतच्या धुळे पथकानेने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून दोघांवर कारवाई केली.